रत्नागिरी:-जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी बुधवारी (ता. 30) पदभार स्विकारला. डॉ. बबिता कमलापूरकर यांची पुणे येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदी त्यांची नियुक्ती झाली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आरोग्य यंत्रणा योग्य पध्दतीने हाताळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत काही अधिकार्यांना प्रतिनियुक्तीने पदभार देण्यात आले होते. त्यात डॉ. कमलापूरकर यांना पुण्यात नियुक्ती दिली गेली. तर सातारा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांना रत्नागिरीत प्रतिनियुक्तीने आणले गेले. तिन वर्षांपुर्वी ते रत्नागिरीत होते. प्रतिकुल परिस्थितीमध्ये त्यांनी उत्तमप्रकारे कामकाज सांभाळले होते. वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त असताना कंत्राटी पध्दतीने जिल्हा परिषद फंडातून बीएएमएस डॉक्टर नियुक्तीचा फंडा त्यांच्या कारकिर्दीत यशस्वीपणे राबविण्यात आला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील दबाव कमी झाला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. योग्य नियोजन करुन ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात त्यांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे. सातारा येथून डॉ. आठल्ये यांना रिलीव्ह ऑर्डर मिळत नव्हती. त्यामुळे मागील आठवडाभर रत्नागिरीत प्रभारींची नियुक्ती केली गेली होती. जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करुन डॉ. आठल्ये यांना तत्काळ रत्नागिरीत रुजू होण्याच्या सुचना दिल्या गेल्या.