जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची अचानक बदली

रत्नागिरी:- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सातारा येथे असलेल्या डॉ. अनिरुध्द अच्युत आठल्ये यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे. कोरोनातील कामकाज असमाधानकारक असल्याच्या कारणावरुन डॉ. कमलापूरकर यांच्या बदलीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला होता.

डॉ. कमलापूरकर यांची पुणे येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्याचा वाढता पॉझीटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियोजन होत नव्हते. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डॉ. कमलापूरकर यांच्या बदलीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर तत्काळ अंमलबजावणी झाली. डॉ. कमलापुरकर या 2019 मध्ये रत्नागिरीत जिल्हा आरोग्य अधिकारी पदी रूजू झाल्या. त्यापुर्वी या पदावर डॉ. अनिरुध्द आठल्ये कार्यरत होते. त्यांची बदली सातारा येथे झाली होती. डॉ. कमलापूरकर यांची बदली झाल्यामुळे प्रतिनियुक्तीवर डॉ. अनिरुध्द आठल्ये यांची नियुक्ती झाली आहे. त्यांची वर्णी लावण्यामध्ये नक्की कोण याबाबत चर्चा सुरु होती.