जिल्हा अ‍ॅग्रिकल्चर झोनला कडाडून विरोध

झोन रद्द करण्याची मागणी; निर्णय बदलाची शक्यता

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या मुळावर येणार्‍या जिल्हा अ‍ॅग्रिकल्चर झोनला कडाडून विरोध झाला आहे. नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी आदींनी हा झोन रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. एकनाथ शिंदे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणावर अन्याय होऊ देणार नाही, असे अश्वासन दिले. 

जिल्हा अ‍ॅग्रिकल्चर झोनमध्ये आल्यामुळे चार नगरपालिका आणि पाच  नगरपंचायती वगळून नवीन घरे, इमारती बांधकामाला निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 401 गावांचा विकास खुंटणार आहे. पाडा वस्ती, वाड्यांना काहीशी शिथिलता आहे; मात्र तशी स्वतंत्र नोंद महसूल विभागात नाही. त्यामुळे ती सवलत देखील कुचकामी ठरणार आहे. 2 डिसेंबरपूर्वी ज्या घरांना, इमारती, प्रकल्पांना मंजुरी दिली आहे त्यांना बांधकाम करता येणार आहे; मात्र त्यानंतरच्या परवानग्या थांबविण्यात आल्या आहेत. याला जिल्ह्यात सर्व थरातून विरोध होत आहे. सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडले जाणार आहेत. त्यांच्या स्वप्नातीले नवीन घरे स्वप्नातच राहण्याची शक्यता या झोनमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे या झोनला विरोध वाढत चालला आहे.