रत्नागिरी:- बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून जिल्ह्यातील 61 परीक्षा केंद्रांवर प्रारंभ झाला आहे. 16 हजार 54 विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात असून दरम्यान कॉपीमुक्त आणि गैरप्रकार रोखण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करडी नजर रोखण्यात आली आहे. यादिवशी पहिला पेपर असल्याने सकाळी सर्वा परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व त्यांच्यासोबत आलेल्या पालकवर्गामुळे प्रचंड गर्दी झालेली होती.
या परीक्षेदरम्यान पहिल्या दिवशी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रत्नागिरी येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाला भेट देऊन तपासणी केली. 18 मार्च रोजी या परीक्षेचा अखेरचा पेपर होणार आहे. या परिक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 38 परिक्षा केंद्रांवर 16 हजार 54 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इ.12 वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
मंगळवारी सकाळी पेपर सुरू होण्यापूर्वी येथील सर्वा परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना दिलेल्या सुचनेनुसार सुमारे तासभर अगोदरच हजेरी लावलेली होती. विद्यार्थ्यांसोबत त्यांना धीर देण्यासाठी आलेले पालकवर्ग यामुळे परिक्षा केंद्रे चांगलीच गजबजलेली होती. त्यामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीने परिसरात वाहतूकी देखील अनेक परिक्षा केंद्राबाहेर कोंडी झालेली पहायला मिळाली. रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय परिक्षा केंद्राच्या ठिकाणी हे चित्र प्रकर्षाने पहायला मिळाले. पेपर सुरू होण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी गेटबाहेर जमलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील परिक्षेसंदर्भांत आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच केंद्रामध्ये सोडण्यात येत होते. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता व दुपार सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्याना परीक्षा दालनात सोडण्यात आले.
गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी – मार्च 2025 परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी महामंडळामार्फत गाड्या नियमित व वेळेत सोडणेबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळ यांना तसेच परीक्षा केंद्रावर अखंडीत विद्युत पुरवठा ठेवण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येत आहे. परीक्षा सुरु होण्याअगोदर परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का ? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल.