जिल्हाभरात पावसाचा जोर वाढला; मुक्काम आणखी दोन दिवस

रत्नागिरी:- पावसाचा जोर सोमवारीही (ता. 25) कायम राहिला आहे. दुपारी कडकडीत उन पडले होते; मात्र सायंकाळी पावसाला सुरवात झाली. वेगवान वार्‍यासह पडणार्‍या पावसामुळे समुद्रही खवळलेला होता. गणेशोत्सवात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे बळराजाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील आठवडयात 149 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी (ता. 25) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 7.23 मिमि पाऊस झाला. त्यात मंडणगड 15, दापोली 14, खेड 4, चिपळूण 0.60, संगमेश्‍वर 11, रत्नागिरी 0.50, लांजा 2, राजापूर 18 मिमिची नोंद झाली. जिल्ह्यात 1 जुनपासून आतापर्यंत 2964 मिमिची नोंद झाली तर गतवर्षी याच कालावधीत 3442 मिमि पाऊस झाला होता. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कातळावरील भातशेती करपून जाण्याची भिती व्यक्त केली जात होती; मात्र विघ्नहर्त्याचे आगमनाची चाहूल लागल्यानंतर पावसाला सुरवात झाली. 18 सप्टेंबरपासून जिल्ह्यात सरींवर सरी सुरु झाल्या. सर्वत्र पाऊस पडल्यामुळे भातपिकांवरील रोगांचा प्रादुर्भावही रोखणे शक्य झाले. कातळावरील भातशेतामध्ये पाणी साचून राहिल्याने नवसंजीवनी मिळाली. शेतकरी राजाची चिंता यामुळे मिटली. सध्या भातं पसवली असून अनेकठिकाणी लोंब्या दिसू लागल्या आहेत. जुनच्या पहिल्याच आठवडयात पेरणी झालेली भातशेतं पुढील आठ दिवसात कापणीयोग्य होतील. असे क्षेत्र कमीच आहे. उशिरोन होणार्‍या भात रोपं आता पसवू लागली आहेत. भागामधील भातशेती पसवण्याच्या स्थितीत आहेत. त्यांना आता खर्‍या अर्थाने पाण्याची गरज असते. योग्यवेळी पाऊस पडत असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात 1 जुनपासून आतापर्यंत सरासरी 2964 मिलिमिटर पाऊस झाला आहे. आठ दिवसांपुर्वी 2815 मिमि नोंद होती. या कालावधीत 149 मिमि पाऊस झाल्यामुळे भातशेतीला संजीवनी मिळाली आहे.