रत्नागिरी:- नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देऊन सुरक्षा व उपाय योजना यांची पाहणी केली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचे त्यांनी कौतुक करताना समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असणार्या फिजिशियन आणि ह्दयरोगतज्ज्ञांची मागणी आरोग्य सचिवांकडे करणार असल्याचेही त्यांनी पाहणीनंतर सांगितले.
नांदेड जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन सुरक्षा यंत्रणांसह आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची पाहणी केली.
बालरुग्ण कक्षा बद्दल जिल्हाधिकार्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठ्याप्रमाणात पदे रिक्त आहेत. मात्र रिक्त पदे असतानाही रुग्णालयाच्या कामकाजात गेल्या चार महिन्यात मोठी सुधारणा झाली असल्याचे जिल्हाधिकार्यांनी रुग्णालय पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा रुग्णालयात जनरल फिजिशियन व ह्दयरोगतज्ज्ञ ही दोन महत्वाची पदे रिक्त आहेत. फिजिशियन नसल्याने आयसीयुमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने अन्य डॉक्टरांवर अवलंबून रहावे लागते. ही दोन्ही पदे भरण्यासंदर्भात बुधवारी असणार्या ‘व्हिसी’मध्ये आपण आरोग्य सचिवांकडे मागणी करणार असल्याचेही जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यात पावणेसात हजार रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात मागील तीन महिन्यात तब्बल पावणेसात हजारहून अधिक रुग्णांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेतले. डॉक्टरांची संख्या कमी असतानाही डेंग्यू व अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. तीन महिन्यात पावणेसात हजार रुग्णांमध्ये 172 रुग्णांचा मृत्यू झाला. यातही आयसीयुमधील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.