जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अचानक ठिय्या आंदोलन; यंत्रणेची एकच धावपळ

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी यांच्या दालनसमोर आज सायंकाळी अचानक एका व्यक्तीने ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी मंगळवारी चिपळूण दौऱ्यावर होते. त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही, असा आंदोलकाचा अट्टाहस होता. स्थलांतराबाबत त्यांना बजावलेली नोटीस आणि पूर रेषेमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी करून संबंधीतांवर कारवाईची मागणी होती. अखेर निवासी
जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी त्याला चांगल्या भाषेत समजावून सांगितले. चौकशी समिती नियुक्त
करून ७ दिवसात अहवाल मागवून संबधितांवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानतंर त्याने ठिय्या मागे घेतला.

अनंत शंकर लांबडे (वरचीपेठ-राजापूर) असे आंदोलकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी अचानक जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. त्याच्या या भुमिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अचंबित झाले. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी अनेक महिने राजापूर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारत आहे. परंतु मला न्याया मिळत नाही. संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन मला पालिकेने स्थलांतराची नोटीस बजावली आहे. आम्ही कुटुंबाला घेऊन कुठे जायचे. पूर रेषेतील बांधकाम अनधिकृत आहेत, तर यापूर्वी मी अनेक तक्रारी दिल्या आहेत. पुराव्यासह निवेदने सादर केली. परंतु पालिकेने त्याला साधी स्थगिती दिली नाही. तक्रारीनंतर हे बांधकम पुर्ण झाले. अशा अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, अशी त्यांची मगाणी होती. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावले. परंतु आंदोलकाने नकार दिला.

या दरम्यान पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. अखेर निवासी जिल्हाधिकारी त्याच्याजवळ गेले.
त्याची बाजू समजावून घेतली. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी
समिती स्थापन करू. सात दिवसात त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करू, असे
लेखी देण्याची भुमिका प्रशासनाने घेतली. परंतु आंदोलक समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, आपल्या भुमिकेवर ठाम होते. अखेर निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यास सांगितले. पोलिसांनी त्याची समजूत काढल्यानंतर त्याने ठिय्या मागे घेतला.