जिद्दी माऊंटेनिअर्सकडून दोन दिवसांत तीन सुळके सर 

रत्नागिरी:- अवघड श्रेणीतील एक आणि सोप्या श्रेणीत दोन असे लोणावळ्यातील भांबुर्डे या गावातील नवरा-नवरी, करवली हे तिन सुळके चढण्याचा आनंद घेत जिद्दी माऊंटेनिअरिंगने साहसी पर्यटनाला पुढे येणार्‍या तरुणाईपुढे आदर्श ठेवला आहे.

लोणावळ्यातील भांबुर्डे या गावात नवरा, नवरी, करवली हे तिन सुळके आहेत. गावातून या सुळक्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा पाऊण तासाची पायपीट करावी लागते. रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनीअरिंग या गिर्यारोही संस्थेने हे तिन्ही सुळके समूहावर आरोहण करण्याची मोहीम आखली. या मोहिमेचे नेतृत्व अरविंद नवेले यांनी केले. या मोहिमेत प्रसाद शिगवण, सतीश पटवर्धन, आकाश नाईक, दिनेश आग्रे, आशिष मोटे, इंद्रजीत खंडागळे हे सहभागी होते. या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे आठ वर्षांचा सृजन पटवर्धन.
शनिवारी पहाटे चार वाजता सर्व टीमचे सदस्य भांबुर्डे गावात पोहोचले. सकाळी साडेसहा वाजता सुळक्याकडे जाणारी वाट पकडली. पाऊण तासात ते सर्वजण सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. एकीकडे थंड गार वारे आणि दुसरीकडे उभाच्या उभा धुक्यात वेढलेला नवरा आणि नवरी हा सुळका. तेथील खिंडीमध्ये बेस कॅम्प लावण्यात आला. सकाळी नऊ वाजता नवरा सुळका आरोहणास सुरुवात केली. नवरा सुळका हा कठीण श्रेणीत मोडतो. तिन तासात सर्व सदस्य सुळक्याच्या माथ्यावर पोहोचले आणि दुपारी 2 वाजता सर्व माघारी परतले. लगेचच वेळ वाया न घालवता याच खिंडीतून नवरा सुळक्याच्या बाजूने करवली सुळक्याकडे प्रस्थान केले. करवली सुळका सोप्या श्रेणीत येतो. सायंकाळी सहा वाजता नवरा-नवरीच्या खिंडीत म्हणजे जिथे बेस कॅम्प लावला. रात्री जेवणाची जबाबदारी दिनेश आणि सतीश यांनी सांभाळली.

दुसर्‍या दिवशी रविवारी पाच वाजता सर्व उठले चहा नाश्ता आटपून नवरी-सुळका सर करण्यासाठी ट्रेकला सुरुवात केली. सकाळी साडेसात वाजता आरोहणाला सुरुवात केली आणि काही तासातच त्या तरुणांनी हा ट्रेक पूर्ण केला. दोन दिवसात हे तिन्ही ट्रेक पूर्ण करत जिद्दी माउंटेनीअरिंग साहसी पर्यटनासाठी उत्सुक तरुणाईला पुढे येण्यासाठी आवाहन केेले आहे.