जिगरबाज! चौदा वर्षांच्या वैष्णवने वाचवले नऊ जणांचे प्राण

खेड:- खेड तालुक्यातील पोसरेखुर्द येथे २२ जुलै रोजी दरड कोसळली. त्यात १७ लोकांनी आपले प्राण गमावले. यामध्ये एक घटना खूप दुर्लक्षित राहिली. पोसरे येथील १४ वर्षाच्या वैष्णव सावंत याला दरड कोसळत असल्याची चाहूल लागली. त्याच्या प्रयत्नामुळे ९ जणांचे प्राण वाचवण्यास मदत झाली. खेड तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडी येथे २२ जुलै रोजी वाडीवर दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये १७ जणांचा बळी गेला. या वाडीतील अशोक श्रीपत चव्हाण हे कुटुंब डोंगराच्या कडेला राहत होते.

संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कसला तरी आवाज येतोय, म्हणून रोहन चव्हाण (वय २८) हा मुलगा बाहेर आला. पाहतोय तर डोंगर सुटत चालला आहे. हे लक्षात आले. तो मदतीसाठी सैरावैरा धावत होता. तो बौद्धवाडीकडे धावत असताना तिकडे गाळ सरकताना दिसला. त्याला काय करावे, ते सुचेना, म्हणून तो आपले शेजारी सावंत कुटुंबाकडे धावत गेला. तेथे प्रकाश सावंत, दिलीप सावंत व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा वैष्णव सावंत होते. ते तिघे चव्हाण यांच्या घराकडे गेले. तोपर्यंत त्यांचे अर्धे घर गाडले गेलेले होते. वरून माती कोसळत असताना वैष्णव आत घुसून प्रत्येकाला बाहेर काढत होता. त्याचे वडील प्रकाश व चुलते दिलीप हेसुद्धा अडकलेले. माणसे, मुले, बायका आक्रोश करत होते. अंगावर पत्रे पडले होते. अशा परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता या मुलाने तब्बल ९ माणसे वाचवली.

वाचवलेली ९ माणसे आज ती माणसे दवाखान्यात आहेत. परंतु ते आज वैष्णव सावंत व कुटुंब यांचे खूप आभार व्यक्त करत आहेत. तो होता, म्हणून आम्ही आज जग पाहतोय अन्यथा, आम्हीदेखील जगाचा निरोप घेतला असता, अशी प्रतिक्रिया रोहन चव्हाण यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी व्यक्त केली.

नऊजण वाचल्याने या शूरवीर मुलाची दखल घेतली जात आहे. विशेष म्हणजे जखमी अवस्थेतील माणसांना बाहेर काढल्यावर आणखी माती आणि चिखलाचा पूर, घर जमीनदोस्त करून गेला. सर्वजण बालंबाल वाचले.