रत्नागिरी:- वादळी परिस्थितीनंतर मासेमारी सावरत असताना आता मच्छीमारांसमोर जेलिफिशचे नवे संकट उभे राहिले आहे. मासेमारीसाठी गेलेल्या रत्नागिरीतील एका पर्ससीन नौकेवरील खालाशांनी समुद्रात डोल। सोडल्यानंतर या डोलीत असंख्य जेलिफिश सापडले. हे जेलिफिश जाळ्यातून बाहेर काढताना मच्छीमार पुरते हवालदिल झाले.
यावर्षी पावसाच्या आणि वादळाच्या छायेत मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा झाला. अडीच महिन्यांच्या कालावधीत अनेकदा वादळी परिस्थितीमुळे मासेमारी हंगाम ठप्प राहिला. याचा मोठा फटका मच्छिमारांना बसला.
मागील काही दिवसांपासून मासेमारी व्यवसायाची आश्वासक सुरुवात झाली होती. आधी तारली नंतर बांगडा आणि आता म्हाकुल या मासळीने मच्छीमारांना आर्थिक हात दिला. म्हाकुल या माशाला उत्तम दर मिळत असल्याने अनेक मच्छीमारांनी म्हाकुल मिळण्यासाठी धाव देखील घेतली. मात्र, मागील काही दिवसांपासून समुद्रात जेलिफिशचे नवे संकट मच्छीमारांसमोर उभे राहिले आहे. यावेळी जेलिफिशचे संकट मोठ्या प्रमाणावर आले असून याचाच फटका रत्नागिरीतील एका पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौकेला बसला.
रत्नागिरीच्या बंदरातून मासेमारीसाठी बाहेर पडलेल्या नौकेला जाळ भरून जेलफिश मिळाल्याची घटना घडली. आधी डोलभरून मासळी मिळाल्याच्या शक्यतेने नौकेवरील मच्छीमारांना आनंद झाला मात्र प्रत्यक्षात जाळ्यात जेलिफिश पाहताच प्रत्येकाचा हिरमोड झाला. जाळ्यात जवळजवळ अर्धा टन जेलिफिश सापडले होते. हे जेलिफिश बाहेर काढताना मच्छीमारांची पुरती दमछाक झाली.