रत्नागिरी:- दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने कोकण मार्गावर धावणार्या जामनगर-तिरुनवेल्ली व गांधीधाम-तिरूनवेल्ली या दोन साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 13 नोव्हेंबरपासून या दोन्ही गाड्या जादा डब्यांच्या धावत आहेत. वाढीव डब्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
जामनगर-तिरूनवेल्ली साप्ताहिक विशेष गाडी 13 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत 23 डब्यांऐवजी 24 डब्यांची धावणार आहे. या गाडीला एक स्लिपर कोच जोडण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासात ही साप्ताहिक गाडी 16 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. गांधीधाम-तिरूनवेल्ली साप्ताहिक विशेष गाडी 16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 22 डब्यां ऐवजी 23 डब्यांची धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. या गाडीलाही 1 स्लिपर कोच डबा वाढवण्यात आला आहे. दिवाळीमध्ये कोकणात फिरण्यासाठी येणार्या पर्यटकांना या गाड्यांचा फायदा होणार आहे. सध्या दिवाळीची सुट्टी असून नियमित रेल्वेगाड्या कोरोनामुळे सुरु झालेल्या नाहीत. लोकांची गर्दीही दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्या धावणार्या गाड्यांची क्षमता वाढविण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे. आरक्षण मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना प्रवास टाळावा लागत आहे. कोकण रेल्वेकडून प्रवाशांची कसून तपासणी होत असल्याने गाडीच्या नियमित वेळेपुर्वी एक तास आधी जावे लागते. गाड्या कमी आणि आरक्षणासाठीची वेटींग लिस्ट अधिक अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खासगी वाहतूकीकडे लोकांचा कल वाढत आहे.