रत्नागिरी:- उत्तरेकडील शीतलहरींनी कोकण किनारी भागातील तापमान खाली आल्याने नवीन वर्षाचा पहिला दिवस गुलाबी हलक्या थंडीच्या चाहुलीने सुरू झाला. आगामी आठवड्यात यामध्ये वाढ होणार असून, कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यात या शीतलहरीं विस्तारत जाणार असून हुडहुडी भरवणार्या थंडीपासून ते क़डाक्याची थंडी भरेपर्यंत जानेवारी महिना गारठण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर भारतामधील काही राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट आल्याने उर्वरित महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यात तामानात घट झाली आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला थंडी अवतरली आहे. तापमानातील घट आणखी दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे निर्माण झालेली पावसाळी स्थिती आणि उत्तरेकडील वार्यांचा प्रभाव नसल्याने डिसेंबरमध्ये झाकोळलेली थंडीची कसर जानेवारीत भरून निघणार असल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे.
दरवर्षीनुसार यंदाही डिसेंबरमध्ये थंडीची कडाका अधिक असेल, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे थंडीवर परिणाम झाला. चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन कोकणातील बहुतांश जिल्ह्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही बाष्प आले. त्यामुळे डिसेंबरमध्ये बहुतांश वेळेला रात्रीचे किमान तापमान सरासरीपुढे राहून थंडी गायब झाली. सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे.पुढील दोन-तीन दिवस थंडीच्या लाटेचा प्रभाव कोकण किनारपट्टी भागात राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण जानेवारीमध्ये किमान तापमान सरासरीखाली राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातील किमान तापमान सरासरीजवळ राहील. सोमवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात 22 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.