खेडः– रक्कम गुंतवल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका तरुणीची ३ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच येथील पोलीस ठाणे गाठले. सायंकाळी उशिरापर्यंत या बाबतचा अधिक तपशील उपलब्ध होवू शकला नाही.
अज्ञात व्यक्तीने तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधत घरबसल्या पैसे कमवता येतील, असे आमिष दाखवत सुरुवातीला १५ हजार रुपये खात्यात जमा करून घेतले. त्या पोटी तरुणीच्या खात्यात जादा परताव्याची रक्कमही जमा झाल्याने तिचा विश्वास बसला. यानंतर दुसऱ्या टप्यात तिच्या खात्यातून २ लाख १५ हजाराची रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली. यावरही संशयिताने जादा परतावा दिला. तिसऱ्या टप्यात आणखी १ लाखाची गुंतवणूक केली. यानंतर जादा परताव्याची रक्कम येणे बंद झाले. ‘त्या’ अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधण्याचा तरुणीने प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समजताच तिला धक्का बसला.