रत्नागिरी:- ‘उठ ओबीसी जागा हो, या संघर्षांचा धागा हो’ असा नारा कापडगाव (ता. रत्नागिरी) येथे झालेल्या ओबीसींच्या बैठकीत देण्यात आला. जातीनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शासनाचे 12 वाजवल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही. यासाठी रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने ओबीसी आंदोलन उभे करू असा निर्धार करण्यात आला.
कापडगाव येथील एका सभागृहात झालेल्या जनजागृती बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता. याप्रसंगी ओबीसी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आरंभीला रघुवीर शेलार सर यांनी ओबीसी बांधव आज तालुक्यात जागृत झाल्याचे सांगतानाच ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी आज गावोगाव फीरुन तालुक्यात बैठकांचे आयोजन करत जागृती करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी शांताराम मालप म्हणाले, ओबीसींना मिळणार्या सवलती आज शासनाने कमी केल्या असून काही बंदही केल्या आहेत. ओबीसींनी आता जागृत होऊन डोळसपणे या सर्व विषयांवर पाहिले पाहिजे व एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे. संघर्ष समितीचे युवा प्रतिनिधी प्रदिप घडशी यांनी 1931 साली ब्रिटीशांनी केलेली जातीनिहाय जनगणना यानंतर आजतागायत झाली नाही. 2021 साल हे जातीनिहाय जनगणनेचे आहे. त्यासाठी सरकारला जागे करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ या.
तालुका पदाधिकारी सौ. साक्षी रावणंग यांनी ओबीसींवर आजपर्यंत कसा अन्याय होत आहे याची माहिती दिली. सर्व ओबीसींनी जागृत होऊन लढायला शिकले पाहिजे. आपण ओबीसी संघर्ष समितीची ताकद व्हा असे आवाहनही त्यांनी केले. तालुका सचिव सुधीर वसावे म्हणाले की, जो पर्यंत सामान्य जनतेला अन्न, वस्त्र, निवारा त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण व रोजगार शासनाकडून उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपला देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे भासवणा-यांना ओळखायला शिकले पाहिजे. गावच्या भौतिक सुविधा म्हणजे विकास नव्हे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
ओबीसींची जातीनिहाय जनगणना आजपर्यंत विविध कारणांनी शासनाने कशी नाकारली. याचे विविध दाखले बि. टी. झोरे यांनी दिले. तर संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश (बावा) साळवी यांनीही जेव्हा संघर्ष समिती हाक मारेल तेव्हा मोठ्या संख्येने हजर रहा असे आवाहन केले.