जागेच्या विक्रीसाठी खोटे घोषणापत्र करत शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- जागेच्या विक्रीसाठी खोटे घोषणापत्र तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीची ही घटना 10 जुलै 2019 ते 16 जुलै 2019 या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय रत्नागिरी येथे घडली आहे.

विजय बाबुराव देसाई (सध्या रा.अंबरनाथ ठाणे मुळ रा.ओरी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात महेश पांडुरंग जुवळे (57,रा मांडवी,रत्नागिरी) यांनी गुरुवारी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,ओरी येथील 10 गुंठे जागेची विक्री करण्यासाठी सुनयना पोतनीस यांनी  विजय देसाईला सन 2001 मध्ये  कुलमुखत्यार पत्र बनवून दिले होते.परंतू 1 नोव्हेंबर 2018 रोजी सुनयना पोतनीय यांचा मृत्यू झाल्याने ते कुलमुखत्यारपत्र रद्द झालेले असतानाही त्याचा वापर करुन देसाईने ओरी येथील 10 गुंठे जागेपैकी 5 गुंठे जागा मुंबईच्या सदानंद सावंत आणि 5 गुंठे जागा ओरी येथील कुणाल देसाई यांना विक्री केली.शासकिय दस्तऐवज तयार करताना कुलमुखत्यारपत्राचा वापर होत असेल तर लिहून देणार्‍या आणि लिहून घेणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झालेला नसावा असा नियम आहे.परंतू विजय देसाईने त्या 10 गुंठे जागेच्या विक्रीवेळी खोटे घोषणापत्र तयार करुन स्वतःच्या फायद्याकरता दस्तऐवज नोंदणी करुन शासनाला ते खोटे घोषणापत्र सादर केले.तसेच कुलमुखत्यारपत्रातील जागेेची विक्री करुन शासनाची फसवणूक केली.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.