रत्नागिरी:-रत्नागिरी हा निसर्गरम्य जिल्हा असून येथे पर्यटनवाढीसाठी पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा पर्यटनदृष्टया जगाच्या पाठीवर नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु या असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केले.
हॉटेल व्यंकटेश येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थाचे राजू भाटलेकर, बाळ माने, रमेश कीर, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे झोनल मॅनेजर केशव कुमार, इन्फीगो आय केअर सेंटरचे डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले जिल्हयाला समुद्रकिनारा, सहयाद्री पर्वतांच्या रांगा, पुरातन धार्मिक स्थळे, कातळशिल्प, येथील रुजकर अन्नपदार्थ, आंबा, काजू आदि फळांपासून बनविलेली विविध उत्पादने आदि पर्यटन वाढीसाठी आवश्यक गोष्टी येथे आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांपर्यंत पोहचिविण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रचार व प्रसिध्दी होणे आवश्यक आहे. पर्यटकांना त्यांच्या आवडी – निवडीनुसार पर्यटनाच्या दृष्टीने वेगवेगळया गोष्टी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. येथे तयार करण्यात होणाऱ्या उत्पादनाचा खप वाढण्यासाठी येथील उत्पादनांची ब्रँडींग होणे गरजेच असून त्यासाठी प्रयत्न केले जातील असे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पर्यटन वाढीसाठी कनेक्टीव्हीटी फार महत्वाची असून ती वाढविण्यासाठी येथील विमानतळ लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. येथील पर्यटनाबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यासाठी टयुरिझम डॅशबोर्ड तयार करणे गरजेच आहे. ज्यावर येथील कृषी उत्पादने, घरगुती उत्पादने, त्यांचे संपर्क क्रमांक आदिंची माहिती असेल. यामाध्यमातून देखील जिल्हयातील पर्यटन मोठया प्रमाणावर वाढण्यास मदत होईल आणि जिल्हा टुरिस्ट हब म्हणून विकसीत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्योग यशस्वी करण्यासाठी स्वतःचे खांदे हेच खरे: रमेश कीर
आताच्या या कठीण काळात स्वतःचे मार्ग स्वतः शोधणे गरजेचे आहे. यशस्वी उद्योग करायचा असेल तर आपले खांदे हेच खरे. कुणावरही अवलंबून राहू नका असा सल्ला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी दिला. पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रत्येकवेळी जिल्हाधिकारी बदलल्यानंतर पर्यटन विषयक बैठक होते आणि या बैठकीवरच आपली माणस खुश होतात. 35 वर्षात अपवादानेच एखादं दुसरे जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकारांचा वापर विकास आणि पर्यटन वाढीसाठी केला आहे. यामुळे जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचे आहे. यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे उभे राहूया आणि एकमेकांशी कनेक्ट राहूया असे रमेश कीर यावेळी म्हणाले.