जाकादेवी खालगाव येथील बारा वर्षीय शाळकरी मुलीचा विंचूदंशाने मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवाशी असलेले महेश विष्णू पानवलकर यांची १२ वर्षीय मुलगी ( इ.७ वी ) हिला मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विंचू दंश झाल्याने तिच्यावरती रत्नागिरी येथील दवाखान्यात उपचार होत असताना गुरुवार दिनांक ३१ रोजी सकाळी पहाटेच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.

सृष्टी महेश पानवलकर ही मुलगी इयत्ता सातवीत शिकत होती.ती अतिशय हुशार आणि जिज्ञासू विद्यार्थी म्हणून परिचित होती. शालेय विविध उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असे. पानवलकर कुटुंब जाकादेवी खालगाव येथे अनेक वर्ष राहत असून सृष्टी महेश पानवलकर हिचे वडील महेश विष्णू पानवलकर हे निवळी येथे लोहार काम करतात. दि.२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरात तिला विंचू दंश झाल्याने तिला उपचारासाठी जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले .तेथून तिला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने सृष्टी हिला तिच्या पालकांनी रत्नागिरीतील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र तिच्याकडे प्रकृतीत सुधारणा झाली नाही. गुरुवार दि .३१ ऑक्टोबर रोजी तिचे दुःखद निधन झाले . सुस्वभावी आणि होतकरू मुलगी सृष्टी महेश पानवलकर हिच्या जाण्याने जाकादेवी खालगाव पंचक्रोशीसह मूळ गाव दांडेआडोम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.