दुसऱ्या दिवशी पावसाची विश्रांती मात्र ढगाळ वातावरण
रत्नागिरी:- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला सलग दोन दिवस झोडपून काढले; मात्र गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली असून दिवसभर ढगाळ वातावरण होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘जवद’ वादळामुळे समुद्र खवळल्याने मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. तर केरळ, तामिळनाडूतील शंभरहून अधिक मच्छीमारी नौकांनी भगवतीसह जयगड बंदराचा आसरा घेतला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात 39.33 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. त्यात मंडणगड 35, दापोली 35, खेड 46, गुहागर 45, चिपळूण 46, संगमेश्वर 23, रत्नागिरी 35, लांजा 45, राजापूर 44 मिमी नोंद झाली. हवामान खात्याने 5 डिसेंबरपर्यंत जिल्हयात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मंगळवारी सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. बुधवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले. वेगवान वारेही वाहत होते. रत्नागिरी शहरातील भगवती बंदर येथील नागरिक तुषार कुबल यांच्या घरावर झाडाची फांदी पडून घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. रात्री उशिराने कुबल यांनी स्वतः माणसे बोलवून फांदी हटवली. जिल्ह्यात झाडे पडण्याचे किरकोळ प्रकार वगळता मोठी घटना घडलेली नाही. विजांच्या कडकडाटामुळे बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील वीज पुरवठा दोन तास खंडित करण्यात आला होता. पावसामुळे फिरण्यासाठी रत्नागिरीतील किनारी भागात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. अनेकांनी माघारी जाणे पसंत केल्याने पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान झाले. दिवसभर जिल्ह्यात सगळीकडेच पावसाळी वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.
पूर्व किनारीपट्टीवर जवद चक्रीवादळ निर्माण झाले असून खोल समुद्रातील वातावरण बिघडले आहे. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीही पूर्णतः ठप्प आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणार्या 3 हजार 77 नौका आहेत. त्यात 3 हजार 519 यांत्रिकी तर 442 बिगर यांत्रिकी नौका आहेत. दिवसभरात एक कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. तसेच वादळामुळे केरळ, तामिळनाडूतील शंभरहून अधिक मच्छीमारी नौका आश्रयासाठी भगवती, मिर्या बंदरात आल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी वातावरण निवळू लागल्यामुळे शुक्रवारपासून मच्छीमार रवाना होतील अशी शक्यता आहे.