रत्नागिरी:- शासनाच्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्याच्या अंतिम आराखड्यात 1 हजार 181 पाणी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी 677 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. या आराखड्यातील कामांची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
‘हर घर नल से जल’ देण्यासाठी जल जीवन मिशन शासनाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला आराखडे तयार करण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक गावाची लोकसंख्येनुसार पाणी योजनांचे नियोजन केले जाणार आहे. गेल्या सहा महिन्यात दुरुस्तीच्या आणि नव्याने करावयाच्या योजनांचे आराखडे तयार केला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 209 गावांमध्ये दुरुस्तीसाठीच्या 703 तर नवीन 478 अशा मिळून 1 हजार 181 पाणी योजनांना निधीची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी 388 कोटी 84 लाख तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी होणार्या 94 योजनांसाठी 278 कोटी 47 लाख रुपयांची गरज आहे. एकुण 677 कोटी 31 लाखाचा जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. तो मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यातील गावनिहाय योजनांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील धनगरवाड्यांसह अनेक वाड्यांना उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. जलजीवन मिशन उपयुक्त ठरणार आहे. त्या-त्या गावाचा आराखडा तयार करुन बंधारे बांधणे, नवीन विहिरी उभारणे, पाऊस पाणी संकलन टाकीच्या माध्यमातूनही पाणी योजनांची अंमलबजावणी यामध्ये केली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी दिले जाणार आहे. वीज पुरवठ्याअभावी योजना अपूर्ण राहत असतील तर त्या ठिकाणी सोलर पंपाचाही उपयोग यामध्ये केला जाईल. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचविण्यासाठी लागणारा खर्च या योजनेतून दिला जाणार आहे.