जलजीवन मिशनमुळे यंदाचा पाणी टंचाई आराखडा निम्म्यावर; आराखडा ५ कोटी २२ लाखांचा 

रत्नागिरी:- जलजीवन मिशनमुळे जिल्ह्याचा यंदाचा पाणीटंचाई आराखडा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार टंचाईला सामोरे जाण्यासाठी 5 कोटी 22 लाख रुपयांची गरज भासणार आहे. गतवर्षी हाच आराखडा 11 कोटीचा होता.

डिसेंबर महिन्यात पाणीटंचाईचा संभाव्य आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाप्रशासनाकडे पाठवायचा असतो. यंदा तालुकास्तरावरुन आराखडे उशिरा आल्यामुळे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला आराखडा बनविण्यासाठी विलंब झाला. जिल्ह्याचा आराखडा तयार करुन मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात त्यावर कार्यवाही होणार आहे. जिल्ह्याचा आराखडा 5 कोटी 22 लाख रुपयांचा आहे. 254 गावातील 587 वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता यामध्ये वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाने टँकर, विंधन विहिरी खोदाई, विंधन विहिर दुरुस्ती, नळपाणी योजना दुरुस्तीची कामे घेतली आहेत. नळ योजना दुरूस्तीसाठी 1 कोटी 41 लाख ठेवण्यात आले असून 12 गावातील 12 वाड्यांचा समावेश आहे. नवीन विंधन विहिरींसाठी 126 गावातील 252 वाड्यांचे नियोजन असुन त्याला 2 कोटी 58 लाख रुपयांची गरज आहे. पाणी योजनांऐवजी विंधन विहिरींकडील निधीची मागणी यंदा अधिक आहे.

केंद्र शासनाच्या हर घर जल से नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनची आखणी करण्यात आली आहे. सुमारे सातशे कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. बहुसंख्य गावांमध्ये योजनांची कामे सुरु असल्याने पाणीटंचाई आराखड्यात दुरुस्तीची कामे घेण्यात आलेली नाहीत. गेल्या तिन वर्षात नळपाणी योजना दुरुस्तीमुळे टंचाई आराखडा दहा कोटीच्या वर गेला होता. गतवर्षी अकरा कोटी रुपयांची तरतुद होती. त्यातील सत्तर टक्के निधी हा दुरुस्तीसाठी होता. यंदा हाच निधी वीस टक्क्यावर आला आहे. आपसुकच टंचाई आराखडाही कमी झाला आहे. भविष्यात दहा वर्षांंपुर्वीप्रमाणेच फक्त विंधन विहिरी, टँकर, विहीरी अधिग्रहीत यासाठीच आराखडा बनविला जाणार आहे.