रत्नागिरी:- जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतुकीला २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत शासनाने बंदी घातली आहे. मेरीटाईम बोर्डाने याबाबत निर्णय घेतला आहे. हे सर्व पर्यटनाशी निगडित असल्याने या परवानग्यांमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी शासनाने जलक्रीडा प्रकारचे मेरीटाईम बोर्डाचे अधिकार काढून ते पर्यटन विकास महामंडळाला दिले आहेत. याला पर्यटन विभागाने दुजोरा दिला. त्यामुळे आगामी पर्यटन हंगामामध्ये या परवानग्या पर्यटन विभागाकडून घ्याव्या लागणार आहेत.
कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमधील समुद्रकिनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्सला पर्यटकांची मोठी पसंती आहे. पर्यटक स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग या साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी येतात. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेलं निळंशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणाचं अनेकांना आकर्षण असतं. यातच कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे भरउन्हातही कोकण हवाहवासा वाटतो. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये अनेक पर्यटक कोकण पर्यटनाचा प्लॅन करतात; परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणातील पर्यटन बंद होतं. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पर्यटन व्यवसाय रुळावर येत होता. कोकणातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. देश-विदेशातून पर्यटकांनी भेट दिल्याने व्यवसाय तेजीत होता. आता हंगाम संपत आल्याने पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या बोटी किनार्यावर आणण्यास सुरवात केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समुद्राला उधाण असल्याने जलक्रीडांना बंदी घालण्यात येते.
मेरीटाईम बोर्डाने या वेळी २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंदीचे आदेश काढले आहे. मेरीटाईम बोर्टाचा थेट पर्यटनाशी काही संबंध नसला तरी जलक्रीडासंदर्भातील सर्व परवानग्या या विभागाकडूनच घेतल्या जात होत्या. जलक्रीडा प्रकार हा पर्यटनाशी निगडित आहे. वॉटर स्पोर्ट्स किंवा बोटिंग व्यावसायिकांना मात्र परवानग्यांसाठी मेरीटाईब बोर्डाकडे हेलपाटे मारावे लागत होते. शासनाने नुकतेच मेरीटाईमचे अधिकार काढून जलक्रीडाचे सर्व अधिकार पर्यटन विकास महामंडळाला दिले आहेत.