रत्नागिरी:-प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून प्रेयसीचा गळा दाबून तिला गळफास लावणाऱ्या नराधम प्रियकर समीर प्रकाश पवार (वय २३, रा. मूळ आगरनरळ शिंदेवाडी, सध्या नांदवडे) याला जयगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याने कु.चैताली संतोष पांचाळ या तरुणीची हत्या केल्याची कबुली जयगड पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे नांदिवडे परिसरात खळबळ उडाली आहे.
नांदिवडे आंबेवाडी येथील कु.चैताली संतोष पांचाळ (वय १९) हि तरुणी गावानजीकच्या एका मेडिकल मध्ये कामाला होती. चैतालीचे नांदिवड येथे राहणार्या समीर पवार सोबत दोन वर्षापुर्वी पासून प्रेमसंबंध होते. परंतु काही महिन्यांपूर्वी त्या दोघांमध्ये खटके उडू लागल्याने चैतालीने समीर पवार सोबत बोलणे टाळले होते. त्यानंतर समीर वारंवार चैतालीच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चैताली समिरकडे दुर्लक्ष करत असल्याने समीरच्या मनात चैताली बद्दल प्रचंड राग निर्माण झाला होता.
शनिवार दि.२३ एप्रिल रोजी चैताली नेहमीप्रमाणे सकाळी मेडिकलमध्ये कामासाठी गेली होती. सायंकाळी मेडिकल बंद झाल्यानंतर मालकांनी तिला घरा कडे जाणार्या रस्त्यावरील तिठ्यावर नेहमी प्रमाणे सोडले. नेहमी तेथून चैताली आपल्या घरी जात असे. शनिवारीही चैताली तिठ्यावरुन आपल्या घराकडे जाणार्या रस्त्यावरून चालत जात होती. परंतु त्यादिवशी समीर चैतालीच्या पाळतीवर होता. यापूर्वीही त्याने चैताली गाठून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता,परंतु चैतालीने त्याच्याशी बोलणे टाळून घरी जाणे पसंत केले होते.
दि. २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास चैताली घरी जात असताना समीरने तिला थांबवले, परंतु ती नेहमीप्रमाणे त्याला टाळून घरी जात असताना समीरने तिला पकडले. त्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर समीरने चैतालीचा गळा आवळला. यामध्ये ती बेशुद्ध पडली. चैतालीचीr हालचाल थंडावल्याने तिचा मृत्यू झाला असा समज समीरचा झाला. त्यानंतर समीरने चैतालीला रस्त्यानजिकच्या आंब्याच्या बागेत ओढत नेले. तेथे चैतालीच्याच ओढणीने गळफास तयार करून त्यामध्ये चैतालीला अडकवले. ओढणीचा फास गळ्याला बसल्याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या चैतालीचा मृत्यू झाला. चैतालीने आत्महत्या केल्याचे भासवून समीर घटनास्थळावरून गायब झाला होता.
घरी न परतलेल्या चैताली चा शोध नातेवाईकांनी सुरू केला परंतु रात्री चैतालीचा शोध लागला नाही. परंतु रविवारी सकाळी रस्त्यानजिकच्या आंब्याच्या बागेत चैतालीचा मृतदेह आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. परंतु घटनास्थळावरील स्थिती संशयास्पद दिसल्याने चैतालीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? असा संशय पोलिसांना आला होता. त्यावरून पोलिसांनी सर्व दिशेने तपास सुरू केला होता. तपासासाठी चैतालीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. गेल्या महिनाभरात तीच्या संपर्कात कोण कोण होते? त्याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर चैत्रालीचा पूर्वीचा प्रियकर समीर पवार याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आढेवेढे घेणार्या समीरला पोलिसांनी आपल्या खास शैलीत विचारल्यानंतर त्याने सर्वप्रथम चैतालीचा गळा आवळला व त्यानंतर तिला गळफास दिल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
चैतालीचे वडील संतोष पांचाळ यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी समीर प्रकाश पवार याच्याविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने समीर पवारला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.अधिक तपास जयगडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. कलेकर करित आहेत.