दापोली:- दापोली तालुक्यामधील साखळोली येथे क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय शिंदे याने त्याचा भाऊ प्रदीप शिंदे याला सामायिक जमिनीमधील झाडे तोडू नको, असे सांगितले. हे सांगत असताना प्रदीप शिंदे याने जमिनीच्या कारणावरून मनात राग धरून शिवीगाळ केली. त्याच्या हातात असणारी कोयती विजय शिंदे याला मारण्यासाठी उगारली. या कोयतीची धार विजय शिंदे याने हाताने पकडली. त्यावेळी विजय शिंदे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली.
दोघांच्या झटापटीत कोयती हातातून खाली पडली. त्यानंतर आरोपी प्रदीप शिंदे याने खाली पडलेल्या जंगली झाडाची काठी घेऊन विजय शिंदे याला मारहाण केली. या मारहाणीत विजय शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरोपी प्रदीप शिंदे यांच्याविरोधात विजय शिंदे यांनी दापोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार ए. एस. गायकवाड करीत आहेत.