सिविल रुग्णालयाचे हात वर; कसून चौकशी सुरू
रत्नागिरी:- कोल्हापूर येथून आलेला औषधे घेऊन आलेल्या दोन गाड्या आठवडा बाजारातून ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यातील सलाईनच्या साठा प्रातांधिकार्यांनी जप्त केला होता. संबधीत प्रकाराची चौकशी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू जाखड यांनी सुरु केली आहे. मात्र आठवडा बाजार येथे सापडलेला औषध साठा जिल्हा रुग्णालयाचा नसून त्यांचा जिल्हा रुग्णालयाशी संबध नाही असा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी केला आहे. त्यामुळे सलाईन घेवून आलेल्या गाड्या बोलविल्या कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोल्हापूर येथून आलेल्या दोन्ही गाड्याच्या ताब्यात घेवून त्यातील सलाईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रांत डॉ.विकास सुर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव यांनी सोमवारी रात्री हि कारवाई केली होती. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू जाखड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हि कारवाई करण्यात आली होती.
टेम्पो चालकाकडे औषधाची कोणतीही रिसिट नव्हती. त्यामुळे तो साठा नेमका कोणाला द्यायचा होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच औषधसाठा जिल्हा रुग्णालयासाठी असल्याचे चालकांने तोंडी सांगितले होते. मात्र जिल्हा रुग्णालयाने असा कोणाताही औषध साठा मागविलेला नाही. जिल्हा रुग्णालय ज्या औषधांची ऑर्डर देते तो साठा जिल्हा रुग्णालयाच्या भांडार विभागातच उतरविला जातो. तो अन्य कोठेही जावू शकत नाही. त्यामुळे संबधीत औषध साठ्याचा जिल्हा रुग्णालयाशी संबध नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी स्पष्ट केले आहे.
जप्त करण्यात आलेला साठा नेमका कुणाचा आहे. हे अध्याप स्पष्ट झालेले नाही. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू जाखड यांनी सुरु केलेल्या चौकशीत औषध साठ्याचे रहस्य बाहेर पडण्याची शक्यता आहे. या प्रकारमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.