रत्नागिरी:– लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई झाली होती. वाहतूक पोलिस आणि आर.टी.ओ.यांनी केलेल्या कारवाई नंतर जप्त केलेली वाहने माळनाका येथील एस.टी.आगारात ठेवण्यात आली, मात्र दंड भरुन वाहने सोडविण्यासाठी गेलेल्या वाहन धारकांना आगारातून वाहन सोडविताना एस.टी.प्रशासनाला दिवसाला 50 रुपये या प्रमाणे वाहन ठेवण्याचे भाडे आकारले जात होते. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेला वाहनधारक एस.टी.च्या नियमामुळे भरडला जात होता.
ही बाब ना.उदय सामंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी एस.टी.प्रशासनाला अशा स्वरुपाची कारवाई करुन जनतेला आर्थिक भूर्दडांमध्ये पाडू नये अशा सूचना केल्या व याबाबत शासनस्तरावरुन आपल्या विभागाने त्वरीत मार्गदर्शन मागवावे असे आदेश केले. तसेच, ना.सामंत यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देवून स्वत: संबंधित विभागाकडे पाठपूरावा केला यामुळे आज एस.टी.च्या आवारात जप्त करुन ठेवलेल्या वाहनांना एस.टी.कडून लादण्यात आलेला दंड माफ करुन गाडया परत मालकाच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्हयातील अनेक तरुणांनी उदय सामंत यांचे आभार मानले.