जनता कर्फ्युमुळे कोल्हापुरातील पर्यटक रत्नागिरीत

किनार्‍यावर गर्दी ; तपासणी नसल्याने संसर्गाचा धोका

रत्नागिरी:- लॉकडाउनमुळे साडे सहा महिने घरात बसून वैतागलेले नागरिक पर्यटनासाठी आता बाहेर पडण्यास उत्सुक आहेत. अनलॉक 4 नंतर जिल्ह्याच्या सीमा खुल्या केल्या आहेत. मात्र कोल्हापूरसह सांगली, सातारा आदी भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. जनता कर्फ्यू लागू केल्याने अनेकांनी विकएंडसाठी (आठवड्याची सुट्टी) रत्नागिरीला पसंती दिली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. बाहेरून येणार्‍यांची कोणतीही तपासणी होत नसल्याने जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्याबंदी उठविल्यानंतर निर्बंधातून मुक्त झालेले नागरिक आता पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. परंतु कोल्हापूर, सांगली, सातारा आधी भागामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोल्हापुरात तर दिवसाला हजाराच्या दरम्यान बाधित सापडत आहेत. मृत्यूदरही झपाट्याने वाढला आहे. संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी कोल्हापुरात जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे फिरायला जाणार्‍या अनेकांची पंचायत झाली. मात्र त्यातुनही बहुतेकजणांनी पर्याय काढला.

कोल्हापूर, सांगलीमध्ये जनता कर्फ्यू घोषित केल्याने पर्यटनाच्यादृष्टीने नियोजन केलेल्या अनेकांनी जवळच्या रत्नागिरी जिल्ह्याला पसंती दिली आहे. विकएंड साजरा करण्यासाठी जिल्ह्याच्या किनार्‍यावर मोठ्या संख्येने कोल्हापूर, सांगलीतील पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारे फुलले आहेत. कोरोनाच्या काळातील ही गर्दी चिंता वाढविणारी आहे. शनिवार, रविवारी रत्नागिरी तालुक्यातील बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी होती. या पर्यटकांची तपासणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा नाही. रत्नागिरीतही कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. येणार्‍या पर्यटकांमुळे अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत
आहे.