खेड:- मुंबईहून रत्नागिरीला येणारी रिक्षा जगबुडी पुलाजवळील वळणाचा अंदाज न आल्यामुळे उलटली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर गुरुवारी सकाळी झाला.
भरणे जगबुडी पुलाचे काम हे तांत्रिकदृष्ट्या अयोग्य पद्धतीने झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महामार्गावर अपघातांचा हा नवीन ‘ब्लॅक स्पॉट’ झाला आहे. गेल्या दोन महिन्यात याठिकाणी चार मोठे अपघात झाले आहेत. आतापर्यंत या पुलावर अपघात होऊन तीन जणांना जीव गमवावा लागला आहे.
भरणे नाका येथे सुरू होणारा उड्डाणपूल त्याच्यानंतर तीव्र वळण असलेला उतार आणि लगेच पूल अशी विचित्र परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. अपघात रोखण्यासाठी केंद्रीय बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जगबुडी पुलाजवळील वळणाचा अंदाज न आल्याने प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा (एमएच ०४ – जेक्यू ७५८३) उलटून अपघात झाला. स्थानिक ग्रामस्थांनी लगेचच जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.