जिल्ह्यात पुन्हा मुसळधार, खेड-राजापुरला सर्वाधिक फटका
रत्नागिरी:- खेड, राजापूरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जगबुडीसह अर्जुना नदीला पूर आला आहे. जगबुडीचे पाणी खेड शहरात शिरू लागले आहे. तर अर्जुना नदीने जवाहर चौकाची वेस ओलांडण्याची तयारी केली आहे. चिपळूणातही पावसाचा जोर कायम असल्यामुळे वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता सायंकाळी होती; मात्र रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, गुहागर, मंडणगड, दापोली तालुक्यात थांबून-थांबून पाऊस सुरुच होता.
सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासांत जिल्ह्यात सरासरी 59.14 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात 94. 30 मिमी नोंदला गेला. तसेच संगमेश्वरात 87 मिमी, खेडमध्ये 65.10 मिमी, लांजामध्ये 60.20 मिमी, मंडणगडमध्ये 56.50 मिमी, चिपळूण 48.70 मिमी, गुहागर 46.30 मिमी, रत्नागिरी 43.40 मिमी, दापोली 30.80 मिमी पाऊस झाला.
गेले दोन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आला होता. चिपळूण, संगमेश्वरसह रत्नागिरी, राजापूरातील नद्यांना पुर आला होता. चिपळूणच्या वाशिष्ठीचा पूर सायंकाळी ओसरला. पण सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाचा जोर सुरुच होता. त्यामुळे वाशिष्ठी दुथडी भरुन वाहत होती. पाऊस सतत पडत राहीला तर रात्री पुन्हा पाणी भरण्याची शक्यता होती. अन्य तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अधुनमधून पावसाच्या सरी सुरुच होत्या. संगमेश्वरातील गडनदीचे पाणीही ओसरल्याने माखजनमधील व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत. खेड तालुक्यातील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन नद्यांनी सोमवारी सकाळी 9 वाजता इशारा पातळी ओलांडली.
जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांनी दुपारी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पालिका प्रशासनाने व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नातुवाडी, शिरवली, पिंपळवाडी, शेलारवाड़ी आणि तळवट या पाचही धरणात पाणी साठा वाढला आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी जगबुडी नदीला मिळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. हे पाणी कधीही बाजारपेठेत घुसण्याची शक्यता होती. तीच परिस्थिती राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली नद्यांची होती. रविवारी सायंकाही जवाहर चौकापर्यंत पुराचे पाणी आले होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतर रात्री पाणी कमी झाले. पण पावसाचा जोर कायम राहील्याने राजापूर शहरावर पुराचे सावट होते.