छोट्या म्हाकुळासाठी मच्छीमारांची समुद्रात धाव; दर मात्र वधारलेलेच 

रत्नागिरी:- दक्षिणेकडून वाहणार्‍या वार्‍यांचा वेग कमी झाला असून पावसानेही उघडीप दिली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीला समुद्रात जाण्यास आरंभ केला आहे. रत्नागिरी किनार्‍यापासून दहा ते बारा वावात म्हाकुळ चांगल्याप्रकारे मिळत असल्याने जयगडपासून हर्णैपर्यंतच्या मच्छीमारांनी धाव घेतली. त्यांना दोनशे ते चारशे किलो म्हाकूळ मिळाला; मात्र उर्वरित मासळीचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे दर वधारलेले आहेत. समुद्रात पाण्याला करंट असल्यामुळे ट्रॉलिंग वगळता गिलनेटसह छोटे मच्छीमार मासेमारीला जाण्याच्या अजुनही प्रतिक्षेतच आहेत.

हंगामाच्या आरंभीला निसर्गाने मच्छीमारांना संकटात टाकले होते. गेले दोन दिवस वातावरण निवळू लागले असून ट्रॉलिंगवाल्यांनी मासेमारीला आरंभ केला आहे. जयगड, मिरकरवाडा, हर्णे येथील ट्रॉलर्स्वाले मासळीसाठी खोल समुद्राकडे जाऊ लागले आहेत. हर्णेतील मच्छीमारांना मासळी शोधत सिंधुदुर्गपर्यंत जावे लागत आहे. तर रत्नागिरीतील काही मच्छीमार दहा ते बारा वावात जाळी टाकत आहेत. मिर्‍यापासून पुढे समुद्रात मंगळवारी (ता. १६) सायंकाळी म्हाकुळचा रिपोर्ट मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मच्छीमारी नौकांनी धाव घेतली. नौकेला दिडशे ते दोनशे किलो मासळी जाळ्यात सापडल्याचे मच्छीमारांनी सांगितले. म्हाकुळला किलोला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. रत्नागिरीच्या जवळील मच्छीमारांसाठी ही समाधानाची बाब ठरली; मात्र अन्य भागातून आलेल्या मच्छीमारांना इंधन खर्चाचा भुर्दंड मासळी पकडण्यासाठी बसत आहे. वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे पहिला पंधरवडा वाया गेला असला तरीही गेले दोन दिवस मच्छीमारांसाठी म्हाकुळ आधार मिळाला आहे. या व्यतिरिक्त अन्य मासळी थोड्या प्रमाणात मिळत असल्याने त्याच दर वधारलेले आहेत. बांगडा किलोला २०० रुपये, टायनी चिंगुळ ३५० रुपये किलो, रेणवी ६०० रुपये किलो तर पापलेट ७०० रुपये किलोला मिळत आहेत. नियमित दरापेक्षा तीस ते चाळीस टक्केनी अधिक दर मिळत असल्याचे अनेकांचे मत आहे.

दरम्यान, मोठे मच्छीमार धोका पत्करुन समुद्रात जात आहेत. पण गिलनेटसह छोटे मच्छीमारांची अजुनही निराशाच आहे. पाण्याला करंट असल्याने नौका समुद्रात नेणे अशक्य आहे. बुधवारी वार्‍याचा वेग कमी होत आला असल्याने पुढील दोन दिवसात मासेमारी सुरु होईल अशी आशा काळबादेवी, कासारवेली, मिर्‍यासह आजूबाजूच्या परिसरातील गिलनेट धारकांनी व्यक्त केली आहे.