रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या नूतनीकरण कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी स्टेडियमच्या नूतनीकरणाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने खेळाडूंमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था गेल्या काही वर्षापासून झाली होती. पॅव्हेलियन तर धोकादायक बनले होते. मैदानावर तर गवताचे साम्रज्य पसरले होते. खेळाडूंमधून त्यामुळे नाराजी उमटली होती. काही क्रीडाप्रेमींनी एकत्र येत मैदानाबाबत जागर करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. सामंत यांनी या मैदानाची तातडीने दुरुस्ती केली जाणार असून निधी मंजूर झाला असल्याची माहिती दिली होती.
या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी हजारो रुपये दरमहा खर्च करण्यात येत होते. यापुढे मैदानाची दुरुस्ती करुन ते जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानंतर क्रिकेट मैदान बनवण्यासाठी मुंबईतील काही क्युरेटर येऊन पाहणी करुन गेले होते. यावेळी त्यांनी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. सध्या मैदानावरील गवत कापण्यात आले असून खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदान तयार करण्यात येत आहे.
ना. सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे येथील पॅव्हेलियनच्या कामाला सुरुवात झाली आहे. सुमारे अडीच कोटी रुपये यासाठी खर्च होणार असून, जुने पॅव्हेलियनचे पत्रे उतरवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पॅव्हेलियनचे काम झाल्यानंतर मैदानाची दुरुस्ती केली जाणार आहे. सध्या सुरु असलेल्या कामामुळे रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
सध्या मैदानावर क्रिकेटबरोबरच अॅथलेटिक्स, खो-खो, कराटे, व्हॉलीबॉल यासह विविध खेळाडू नियमित सराव करीत असतात.