रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत सर्वांचे आकर्षण ठरलेल्या कशेडी बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. खेडकडून सुरु झालेली खोदाई पोलादपूरच्या बाजूने लवकरच पूर्ण होईल. कोरोनामुळे मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पोलादपूर ते खेड दरम्यान सह्याद्रीच्या पर्वतरांगातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डोंगरातून पुढे जातो. चौपदरीकरणांतर्गत याठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जात आहे. या रस्त्याचे खेड बाजूने काम सुरू झाले. आतापर्यंत सहाशे मीटर अंतराचा भुयारी मार्ग तयार झाला आहे. सह्याद्रीचा कातळ फोडून प्रत्येकी तीन पदरी महामार्गावरून दोन मार्गिका उभारण्यात येत आहेत. 1.84 किलोमीटर भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्याय म्हणून उपयुक्त ठरणार आहे. 2019 साली नोव्हेंबर महिन्यात हे काम सुरु झाले. कोरोना मुळे या कामाचा वेग कमी झाला होता. मे 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत शासनाकडून देण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या भुयारी मार्गाच्या दुतर्फा जोड रस्ते करण्यात येणार आहेत. ते आणि बोगदा मिळून 441 कोटी रुपये खर्च होणार आहेत. भुयाराचे सध्या 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. पोलादपूरच्या बाजूने बोगद्याचे तोंड येत्या दोन महिन्यात खुले होईल. त्यानंतर आतील बाजूने काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. खोदकामासाठी बुमर हे यंत्र वापरले जात आहे. याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडला जातो. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पध्दतीने भुयाराचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे.