चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर; तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

खेड:- खेड तालुक्यातील आस्तान ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या तब्बल ८ लाख २४ हजार ७३० रुपये  निधी गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शरद साहेबराव भांड यांनी चौकशीअंती खेड पोलीस ठाण्यात या कथित गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा फिर्याद दाखल केली आहे. 

  या प्रकरणी संशयित आरोपी शशिकांत शंकर जाधव ग्रामसेवक ग्रांमपचायत अस्तान ता. खेड मुळ रा. विर,बौध्दवाडी ता.चिपळूण, जि. रत्नागिरी, तत्कालीन सरपंच दिपक जगन्नाथ मोरे रा. सवणस ता. खेड, जि. रत्नागिरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आस्तान ग्रा.पं. मध्ये सन २०१७-१८, २०१९-२०२० या आर्थिक वर्षात या निधी वापरात अनियमितता करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 

या कथित प्रकरणी संशयित आरोपी अस्तान ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व अस्तान ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करीत असताना, त्यांनी एकमेकांचे संगनमताने व सहाय्याने १४ व्या वित्त आयोगाची मंजूर रक्कम व ग्रामनिधीची रक्कम मिळून ८ लाख २४ हजार ७३० रुपये इतक्या रक्कमेच्या कामामध्ये अनियमितता करून आरोपी यांनी रक्कम स्वतः च्या  नावे काढून अपहार केला म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. हिंगे करत आहेत.