जि. प. सभेत बनेंचे आश्वासन
रत्नागिरी:- सरोवर संवर्धनअंतर्गत मंजूर विकासकामांच्या धनादेश गहाळ प्रकरणाची चौकशीचा अहवाला आल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी सर्वसाधारण सभेत दिले.
गेले काही दिवस चर्चेत असलेल्या धनादेश गहाळ प्रकरणाबाबत सदस्य अण्णा कदम यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. धनादेश केबीनच्या दरवाज्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन चौकशी लावण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु झालेली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे बने यांनी सांगितले. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्यांच्या नियुक्तीवरुन चारुता कामतेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दापोली तालुका वैद्यकीय अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित नसतो. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकार्यांनाही सुचना केल्या होत्या. गरज असताना अधिकारी नसतील तर त्यांची नियुक्त करुन उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला. आरोग्यमंत्री आले तेव्हा ते दौर्यावेळी उपस्थित होते. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड म्हणाल्या, संबंधित अधिकार्यांची नियुक्ती आसुद येथे आहे. त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला असून ते जर उपस्थित राहत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या चर्चेवेळी काही सदस्यांनी त्या अधिकार्याची बदली करा असा प्रस्ताव मांडला; मात्र त्या अधिकार्याची नियुक्ती ही शासनाकडून आसुद येथे केली असल्यामुळे त्यांना अन्य ठिकाणी बदली करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. जिल्हास्तरावर हा निर्णय घेता येणार नाही असेही बजावले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना काळात बनवण्यात आलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्याच्या दर्जाबाबत विक्रांत जाधव यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्या प्रकरणाची चौकशी वरीष्ठांमार्फत करावी अशी मागणी केली. यावर प्रशासनाकडून कोणती पावले उचलली असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची फाईल दोन दिवसात आरोग्य संचालकांकडे चौकशीसाठी पाठवली जाईल असे आश्वासन सीईओंनी दिले.