चिपळूण:- बहादूरशेख नाका येथे रविवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली. हमीद अहमद शेख (वय ३८, रा. काविळतळी, चिपळूण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पाेलिसांनी अवघ्या दीड तासात एका तरुणाला अटक केली असून एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे. या दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. मात्र, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या खूनप्रकरणी चिपळुणातील वडार काॅलनी येथे राहणाऱ्या नीलेश अनंत जाधव (२८) याला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता शहरातील बहादूरशेख नाक्याजवळ वडार कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुकानासमोर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे काही नागरिकांना दिसले. याची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षद हेंगे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
या तरुणाच्या डोक्याजवळच रक्ताने माखलेला एक दगड सापडल्याने हा खून असल्याचा संशय पाेलिसांना आला. हमीदशी झालेल्या किरकोळ वादातून हा खून झाल्याचे समोर येत आहे. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला असून, दोघांनीही मद्यप्राशन केल्याची कबुली नीलेश व त्याच्या सहकाऱ्याने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी चिपळूण येथे येऊन माहिती घेतली.
हमीद उत्तम क्रिकेटर
हमीद शेख हा अंडरआर्मचा उत्तम क्रिकेटर होता. ‘कलर’ या टोपण नावाने त्याला ओळखले जायचे. काविळतळी येथील तौसा अँड तौसा संघातून ताे खेळायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याला व्यसन लागले हाेते. पेट्रोल व भुरट्या चोरीप्रकरणी त्याच्यावर काही गुन्हेही दाखल झाले होते.