चिपळूण खूनप्रकरणी आरोपीला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी

चिपळूण:- ऐन गणेशोत्सवात चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे हमीद शेख उर्फ कलर या तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला काल सोमवारी चिपळूण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. १३ सप्टेंबरपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसऱ्या अल्पवयीन आरोपीला रत्नागिरी येथे बाल न्यायालयात हजर केले असता त्याला बालसुधार गृहात पाठविण्यात आले.

शहरातील बहादूरशेख नाका येथे शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर हमीद अहमंद शेख उर्फ कलर (३५, रा. सध्या कावीळतळी- चिपळूण, मूळ रा. कराड) याचा आरोपी निलेश आनंद जाधव (३०, रा. वडार कॉलनी, चिपळूण) व अन्य एका अल्पवयीन युवकामध्ये वाद झाला. यातून निलेश जाधव याने हमीद शेखच्या डोक्यात फरशी घातली आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने डोक्यात दगड घातला होता. रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी हा खून उघड झाल्यावर काही तासात पोलिसांनी आरोपींना अटक केले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी त्यांची चौकशी करतानाच आरोपींनी खून आपणच केल्याची कबुली दिली. खुनाचा छडा अवघ्या काही तासात लावण्यात चिपळूण पोलिसांना मोठे यश आले. सोमवारी आरोपी निलेश जाधव याला चिपळूण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता शुक्रवार दि. १३ रोजी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे, तर दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर केले असता बालसुधारगृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत.