चिपळूणात दिराचा वहिनीवर सुऱ्याने वार, महिला जखमी

चिपळूण:- तालुक्यातील गोवळकोट भैरवकरवाडी येथे दारुच्या नशेत चुलत दिराने वहिनीवर सुऱ्याने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद सौ. समीक्षा भैरवकर (35, गोवळकोट, चिपळूण) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार दिर शांताराम भैरवकर (43) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 जून रोजी रात्री 11 वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीक्षा व त्यांचे पती आपल्या नातेवाईकांना सोडून घरी आल्या. आपल्याकडे नातेवाईक का आले याचा राग धरुन चुलत दिर शांताराम भैरवकर याने दारुच्या नशेत शिवीगाळ करत समीक्षा यांचे पतींना हाताने मारहाण केली. यावेळी समीक्षा या पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता शांताराम याने हातातील मच्छी कापण्याच्या सूऱ्याने समीक्षा यांच्यावर वार केला. यामध्ये समीक्षा यांच्या डोक्याला दुखापत झाली.

समीक्षा यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार शांताराम भैरवकर याच्यावर भादविकलम 326, 323, 506, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळोखे करत आहेत.