चिपळूणात ट्रकच्या धडकेत दोघेजण जखमी

चिपळूण:- ट्रकवरील अज्ञात चालकाने दुचाकीला धडक दिल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित श्रीकांत गोवासी (18, सध्या शिवनदी, चिपळूण, मूळ हातकंणगले, कोल्हापूर), रितिक कार्तिक गोसावी अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद रोहित गोसावी यांनी पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित गोसावी हे आपल्या पुतण्यासह कराड गुहागर मार्गाने कुंभार्ली घाटातून चिपळूणच्या दिशेने जात होते. यावेळी पोफळी येथील एका वळणावर समोरुन येणार्‍या एका अज्ञात आयशर सारख्या ट्रकने खडडा चुकवताना विरुध्द दिशेला येवून दुचाकीला धडक दिली. या धडकेत रोहित गोसावी आणि रितिक गोसावी हे जखमी झाले. त्यांनी याबाबत अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (अ), ब नुसार गुन्हा दाखल केला आहे.