चिपळूणात घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

चिपळूण:- तालुक्यातील खेर्डी देवरुखकरचाळ, दत्तवाडी येथे घरफोडून अज्ञाताने दागिन्यांची चोरी केल्याची घटना 29 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान घडली. दत्ताराम कराडकर (55) देवरुखकरचाळ येथे भाडयाने राहतात.  त्यांचे बंद घर फोडून अज्ञाताने सोने आणि पैशाची चोरी केली. याबाबत कराडकर यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडकर हे आपल्या मूळ गावी शेल्डी, खेड येथे गेले होते. यावेळी बंद घराची कौले काढून चोरटयाने आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील 12 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन आणि 18 हजार रुपये रक्कम असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. कराडकर यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.