चिपळूण:- चिपळुणातील खेर्डी येथे पाटणच्या दिशेने 6 बैल घेवून जाणारी चारचाकी बुधवारी पहाटे 5 वा. च्या सुमारास पकडण्यात आली. पोलिसांना पाहताच एक फरार झाला तर अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष रामचंद्र सोनावणे (19, पाटण), दिलीप शंकर बल्लाळ (पाटण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील एकजण फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक गाडी 6 बैलांना घेवून पाटणच्या दिशेने जात आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही माहिती रात्री गस्तीवरील पोलिसांना देण्यात आली. ही गाडी चिपळूण कराड मार्गावरील खेर्डी येथे आल्यावर गाडीची तपासणी करण्यात आली. या गाडीत 6 बैल कोंबून भरलेले होते. पाटणच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने घेवून जात असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली. यातील एकजण पोलीस येत असल्याची माहिती मिळताच फरार झाला. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून संतोष सोनावणे, दिलीप बल्लाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.