परिसरात गुडघाभर चिखल; पाच दिवसानंतरही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षच
रत्नागिरी:- चिपळूणात आलेल्या महापुरात शंकरवाडी आणि मुरादपूर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शंकरवाडी परिसरात ७ घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून गुडघाभर चिखल असल्याने आजतागायत म्हणावी तशी मदत या भागात पोहोचलेली नाही. घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी एकही लोकप्रतिनिधी शंकरवाडीत पोहोचलेला नाही.
गुरूवारी पहाटेच्या सुमारास चिपळूण शहरात महापूर आला. या महापुरात होत्याचे नव्हते काही क्षणात झाले. ४८ तास उलटून गेले तरी चिपळुणातील पाणी ओसरले नव्हते. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी आकांडतांडव केला तर काहींनी आपले उभे केलेले संसार वाहून जाताना उघड्या डोळ्यांनी पाहिले. हे चित्र फार विदारक आहे. अशा परिस्थितीत मदतीचे हात पुढे आले. मात्र ठराविक भागातच मदत पोहोचू लागल्याने ज्या ठिकाणी सर्वात मोठे नुकसान झाले अशी ठिकाणे आजही मदतीपासून वंचित राहिली आहेत.
शंकरवाडी परिसरात नाथजोगी समाजाची वस्ती आहे. जवळजवळ ३५ ते ४० कुटुंबे या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गुरूवारी पहाटे अंथरूणात पाणी आल्यानंतर पाणी शिरल्याची जाण सार्यांना झाली आणि बघताबघता शंकरवाडीत आकांडतांडव सुरू झाले. सार्यांनीच आपला जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी धाव धेतली. अनेकांनी दुमजली घरांच्या टेरेसचा आसरा घेतला.
शंकरवाडी परिसर हा नदीकिनारी असल्याने या परिसरात पुराचे पाणी चटकन भरते. गुरूवारी असाच प्रकार या ठिकाणी घडला. बघताबघता पाणी छातीपर्यंत येऊन पोहोचले आणि अशा परिस्थितीत शेखर वाटेकर यांच्या घराला पाण्याने वेढा दिला. संपूर्ण घर पाण्याखाली जाण्याची वेळ आलेली असताना वाटेकर कुटुंबाने माळ्यावर आसरा घेतला. ४८ तास हे कुटुंब माळ्यावरच अडकून होते.
शंकरवाडी परिसरात सर्वात मोठी पडझड झाली आहे. डोळ्यादेखत अनेकांचे संसार वाहून जात होते. केवळ आकांडतांडव करण्यापलिकडे ही मंडळी काहीच करू शकत नव्हती. पाण्याने रौद्र रूप धारण केले आणि बघताबघता यातील ७ घरे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे वाहून गेली.
पुराच्या पाण्यात सर्व साहित्य वाहून गेले. घरातील कपडालत्ता त्याचबरोबर भांडीकुंडीदेखील वाहून गेली. सिलेंडर तर चाकाप्रमाणे वाहून गेले. गॅस शेगड्या, मिक्सर व संसारोपयोगी सर्व साहित्य एका क्षणात पुराच्या पाण्यात वाहून गेले.
शंकरवाडी परिसरातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही त्या ठिकाणी म्हणावी तशी मदत पोहोचलेली नाही. या परिसरात गुडघाभर चिखल रस्त्यावर आहे तर शाबूत राहिलेल्या घरांमध्ये कंबरेएवढा चिखल साचला आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी मदतकार्य पोहोचविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. येथील ग्रामस्थ आजही मदतीची याचना करीत आहेत.
या परिसरात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मदत पोहोचण्यात अडचणी येत असताना येथील लोकांना पावसाच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आलेली आहे. हे चित्र फार बोलके असून दुर्लक्षित राहिलेल्या या भागाला सर्वाधिक मदत पोहोचावी अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.