चिपळूण:- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागात 4 कोटी 8 लाखाचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात ठेकेदारांची अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पध्दतीने बोगस ठेकेदाराच्या नावाने वळवण्यात आली. या गैरव्यवहारप्रकरणी एका महिलेसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजित रामसे यांनी पोलीस ठाण्यात दिली.
सविस्तर वृत्त असे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील व्यवहारात अनियमितता असल्याचे अभियंता अमरजित रामसे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेतली. गेले काही दिवस पोलिसांमार्फत चौकशी सुरु होती. संशयित 7 जणांनी मित्र व नातेवाईकांच्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम भरली. त्यानंतर दोन लिपिकांनी सदरची रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर वळवली. दोन वर्षे हा प्रकार सुरु होता. याविषयी चौकशीअंती पोलिसांनी सर्वांना अटक केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणच्या माध्यमातून कोटयवधीची विकास कामे केली जातात. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकामाच्या कामापोटी याच कार्यालयातून देयके अदा केली जातात. सलग काम करणारे ठेकेदार ही रक्कम काढत नसल्याने ही रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तशीच शिल्लक राहते. त्याचा फायदा उठवत दोन लिपिकांनी मित्र व नातेवाईकांच्या मदतीने अपहार केल्याचे पुढे आले आहे.