चिपळूण:- चिपळूणमध्ये कामानिमित्त दुचाकीवरुन जाणाऱ्या सख्ख्या भावांचा शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास उमरोली- गायकरवाडी येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात इतका मोठा होता की, त्यांच्या दुचाकीचे दोन तुकडे झाले. भावेश भगवान पालांडे (21) व यश भगवान पालांडे (17) अशी मृत्यू झालेल्या दोन भावांची नावे आहेत.
खेडमधील सार्पिली येथील पालांडे कुटुंब चिपळूणतील मार्गताम्हाने खुर्द येथे आजोळी कित्येक वर्षे वास्तव्यास आहे. भावेश आणि यश हे दोघे आई-वडिलांसह येथे राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोघेही भाऊ दुचाकीने चिपळूणच्या दिशेने जात होते. उमरोली गायकरवाडीजवळ मोरीवर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
यातील भावेश हा मुंबईला नोकरीला असून सध्या तो गावाला आला होता. तसेच यश हा वाहने दुरुस्तीचे काम शिकत होता. यशने यावर्षी 12 वीची परीक्षा दिली होती. दोन्ही भावांचे वाढदिवसही मे महिन्यातच होते. भावेशचा वाढदिवस 6 मे रोजी झाला होता, तर यशचा वाढदिवस 26 मे रोजी होता. या दोन्ही भावांच्या अपघाती निधनाने मार्गताम्हाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.