चिपळूणमधील महापुराने ओलांडली 100 वर्षांपूर्वीची पातळी

रत्नागिरी:- चिपळूण आणि खेडमधील जलप्रलयाने १०० वर्षांपूर्वीच्या सर्वांत जास्त पुराची पातळी ओलांडली. नैसर्गिक आपत्तीने पाटबंधारे विभागाचाही अंदाज चुकवला असून, पूररेषेच्या रेड लाईनच्या वर दीड ते दोन फूट पाणी आले. चिपळूण शहर ९० टक्के तर खेड ६० ते ७० टक्के पूररेषेखाली आले आहे. या जलप्रलयाने शासकीय यंत्रणेला फेरअभ्यास करण्याची वेळ आणली आहे. 

चिपळूण, खेडच्या महापुराने सर्वांचेच अंदाज चुकवले. जिल्ह्यात झालेल्या २०१९ च्या अतिवृष्टीनंतर शासनाच्या आदेशाने येथील पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील सर्व नद्यांची पूररेषा निश्चित करण्याचे काम हाती घेतले. ब्ल्यू लाईनसाठी गेल्या २५ वर्षांतील सर्वांत मोठ्या पुराचा विचार करण्यात आला होता, तर रेड लाईनसाठी गेल्या १०० वर्षांमध्ये झालेल्या सर्वांत मोठ्या पुराचा विचार केला होता. त्यामध्ये तीन लाख क्युसेक पाणी भरण्याचा विचार झाला; मात्र २२ ते २४ जुलैला आलेल्या महापुराने सर्वांचे ठोकताळे बिघडवून टाकले. कापसी नदी, गड नदी, बाव नदी, शास्त्री नदी, सोनवी नदी, जगबुडी, वाशिष्ठी, काजळी नद्यांचा यामध्ये विचार झाला. त्याचे सर्वेक्षण करून गावांमधील शाळा, मंदिरे, महावितरणचे विद्युत खांब यावर याचे मार्किंग (खुणा) करण्यात आले होते.

चिपळूणच्या वाशिष्ठी आणि खेडच्या जगबुडी नदीचा विचार केला असता शहरांमध्ये सुमारे नऊ फुटांवर (उंची) खुणा करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात झालेल्या जलप्रलयाने खेड, चिपळूणमधील नद्यांनी १०० वर्षांपूर्वीचा अंदाज चुकवत ही पातळी पार करून त्यावर दीड ते दोन फूट पाणी होते. त्यामुळे आता ९० टक्के चिपळूण शहर पूररेषेमध्ये आहे. तर खेड शहरदेखील ५० ते ६० टक्के पूररेषेखाली आले आहे. महापुराने पाटबंधारे विभागही बुचकळ्यात पडला आहे. त्यामुळे त्यांनी या पुराचा फेरअभ्यास सुरू केला आहे. या महापुराचा संपूर्ण अहवाल पाटबंधारे विभागाने शासनाला सादर केला आहे. शासनाला पूररेषेचा आणि पूररेषेमध्ये येणाऱ्या घरांच्या पुनर्वसनाबाबत विचार करावा लागणार आहे.