चिपळूणमधील पूर ओसरण्यास सुरुवात मात्र कोयनेतून पाण्याच्या विसर्गाचा धोका

चिपळूण:- गेले 24 तासात पुराच्या पाण्यात काढल्यानंतर चिपळूणातील पाणी शुक्रवारी सकाळी ओसारण्यास सुरुवात झाली होती. मात्र कोयनातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने त्याचा पुन्हा परिणाम चिपळूणवर होतो का ते लवकरच समजणार आहे. एनडीआरएफसह नेव्ही, आर्मीची पथके 24 तासानंतर चिपळूणकडे रवाना झाली आहेत, तर गुरुवारी रात्रीपासूनच रेस्क्यू ऑपेशनला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे गुरुवारी पहाटेपासून चिपळूणमध्ये पुरजन्यस्थिती निर्माण झाली. कधी नव्हे तो चिपळूण, खेर्डी आणि आजूबाजूच्या परिसर पाण्याने व्यापला गेला.

परिस्थिती होणार हा अंदाज असतानाही मदत पथके खूप उशिरा चिपळूणच्या दिशेने निघाली. वाटेत अनेक नैसर्गिक अडचणी आल्या आणि एनडीआरएफ 16 तासानंतर रात्री 8 च्या दरम्यान चिपळूणला पोहोचले. जितकी शक्य तितकी मदत एनडीआरएफने केली. हेलपिंग हँड, रत्नदुर्ग मौंटेनिअर्स यांनीही रत्नागिरीतुन थेट चिपळूणला जाऊन अडचणीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. जयगड, दापोली, गुहागर येथून अनेक मच्छीमारी नौकांनी चिपळूनमध्ये आपल्या बोटी नेल्या.

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी वायरलेसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिपळूणमध्ये 15 बोटी उपलब्ध असून त्यापैकी 8 बोटी मार्फत बचाव कार्य सुरु आहे. नेटवर्क नसल्याने फोन लागत नाहीत. मार्फतच संदेशवहन सुरु ठेवणेबाबत सूचीत केलेले आहे. खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून मदत कार्यास वेग आला आहे. सकाळी चिपळूणातील पावसाचा जोर ओसरला होता. गोवळकोट रस्त्यावरील पुराचे पाणी साधारण 3 फुटाने कमी झाले होते. मात्र कोयनेचा विसर्ग सुरू झाला असून त्याचा परिणाम चिपळूण पूर्वस्थितीवर किती होतो हे लवकरच समजणार आहे.