चिपळुणात पानटपरीवर सापडला ६० ग्रॅम गांजा

चिपळूण:- पान टपऱ्यावर छुप्या पध्दतीने गांजा विक्री होत असल्याने पोलिसांकडून शहरासह परिसरात टपऱ्यांची तपासणी मोहीम सुरु आहे. शुक्रवारी या तपासणीत खेर्डी-मोळेवाडी येथे एका पानटपरीत पोलिसांना ६० ग्रॅम गांजा सापडला. संशयित टपरीचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने गांजा कोणाकडून आणला, हे पोलीस तपासणीतून पुढे येणार आहे.

साईराज मनोहर कदम (खेर्डी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी नव्याने सुरु असलेल्या इमारतीमध्ये काही तरुण गांजा ओढताना त्यांना रंगेहाथ पकडल्याच्या खळबळजनक घटनेनंतर शहरात राजरोसपणे सुरु असलेला गांजा विक्रीचे उच्चाटन व्हावे, यासाठी शहरातील सामाजिक संस्थांसह राजकीय पक्षाच्या पुढाकाराने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत पोलिसांनी गांजा बहाद्दरांवरील कारवाईसाठी स्वतंत्र पथक तयार करून गांजा बहाद्दरावर धडक कारवाई करण्यातआली होती. तसेच छुप्या पध्दतीने पानटप्रीवरही गांजा विक्री होत असल्याच्या माहितीनुसार पोलिसांनी शहरासह मोक्याच्या ठिकाणावरील पानटपऱ्यांची काही दिवसांपासून तपासणी सुरु केली आहे. अधूनमधून ही तपासणी मोहीम राबवली जात असताना शुक्रवारी शहरालगतच्या खेर्डी-माळेवाडी येथे एका पानटपरीची पोलिसांनी तपासणी सुरु असता त्यात ११ पुड्यांमध्ये ५० ते ६० ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून या प्रकरणी संशयित म्हणून साईराज कदम याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, हा गांजा कोणाकडून खरेदी केला, शिवाय याचे कनेक्शन कुठपर्यंत आहे तसेच यामध्ये आणखी कितीजण सहभागी आहेत, हे पोलीस तपासातून पुढे येणार आहे.