चिपळुणात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला नेपाळी वृद्धाचा मृतदेह

चिपळूण:-  शहरातील विरेश्वर तलावासमोरील नगर परिषदेच्या आरक्षण जागेत भराव टाकत असताना त्याठिकाणच्या एका झाडाखाली वयोवृद्धाने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढलून आला. ही घटना सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उघडीस आली. त्या मृतदेहाच्या जॅकेटमध्ये आढळून आलेल्या आधार कार्डवरुन हा मृतदेह रत्नागिरी येथे आंब्याची राखण करण्यासाठी जात असलेल्या नेपाळमधील वृद्धाचा असल्याचे उघड झाले. या वृद्धाची चिपळूण पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

धन बहाद्दूर कडायत (65, नेपाळ) असे त्या वृद्धाचे नाव आहे. नगर परिषदेने शहरातील विरेश्वर तलावासमोरील जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली असून त्याठिकाणी वाशिष्ठीनदीतील गाळ टाकून भराव करण्यात येत आहे. काही दिवसांपासून या कामास सुरुवात झाली आहे. झाडीझुडपाने वेढलेल्या या मैदानावर सोमवारी भरावाचे काम सुरू असताना तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याना दुर्गंधी येवू लागली. त्यावेळी त्यांनी एका झाडाखाली पाहिले असता त्याठिकाणी झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या स्थितीत एका वृद्धाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. शिवाय या वृद्धाने परिधान केलेल्या चफ्पल देखील झाडाच्या लगत बाजूला काढून ठेवली होती. याबाबत त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानुसार घटनास्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, प्रमोद कदम, अशोक मुंढे आदी दाखल झाले.

पोलिसांनी त्या वृद्धाने परिधान केलेल्या जॅकेट तसेच टी-शर्टचे खिसे तपासले असता त्यामध्ये पैसे, घडयाळ, तंबाखूची पुडी, अर्धवट विडी, तसेच आधार कार्ड आदी वस्तू आढळून आल्या.

आधार कार्डसह घडयाळावरून हा मृतदेह नेपाळ येथील धन कडायत या वृद्धाचा असल्याचे उघड झाले. 22 डिसेंबर रोजी धन कडायत यांच्यासह अन्य 13 जण हे नेपाळहून रत्नागिरी येथे आंब्याची राखण करण्यासाठी जात होते. त्या दिवशी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात थांबली होती. त्यावेळी धन कडायत हे लघुशंकेसाठी गाडीतून बाहेर पडले. मात्र त्यानंतर बराचवेळ झाले तरी ते पुन्हा गाडी ठिकाणी आले नाहीत. त्यांच्यासमवेत असलेल्या इतरानी त्यांचा शोध घेतला असता ते कोठेही सापडले नाहीत. अखेर त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार धन कडायत हे बेपत्ता झाल्याची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करत होते. कडायत यांच्या सापडलेल्या मृतदेहाबाबत माहिती पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली आहे.

शवविच्छेदनासाठी हा मृतदेह कामथे रुग्णालयात नेण्यात आले. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.