चिपळुणातील रस्ते अपघातात दोन ठार

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कळंबस्ते आणि चिपळूण- गुहागर मार्गावरील उमरोली येथे झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातांत दोघेजण ठार झाले आहेत. कळंबस्ते येथे एसटीखाली सापडून अरविंद हनुमंत माने (४५, रा. खेड महात्मा फुले नगर) यांचा, तर दुसऱ्या एका घटनेत तानाजी शिवराम बोबले यांचा मृत्यू झाला आहे.

कळंबस्ते येथे गुरुवारी (ता. ३०) रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. यामध्ये अरविंद माने हे खेडमधून चिपळूणकडे मोटारसायकलने येल असता ते कळंबस्ते येथे आल्यावर गुहागर डेपोच्या एसटीला डावीकडून ओव्हरटेक करत असताना अचानक समोर म्हैस आली आणि त्यांची मोटारसायकल म्हैशीवर आदळली. यात ते उजव्या बाजूला फेकले गेले आणि मागून येणाऱ्या एसटीच्या मागील चाकाखाली चिरडले. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शैक्षणिक सहल

घेऊन हर्णे येथून परतताना एसटीचा हा अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेले अरविंद माने हे कराडमध्ये रुग्णालयात असलेल्या आपल्या भावाला बघण्यासाठी चालले होते.

दुसऱ्या घटनेत, गुहागर मार्गावरील उमरोली येथे अज्ञात टेम्पोने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात तानाजी शिवराम बोबले यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मण बोबले, शिवराम बोबले यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता. २९) सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास उमरोली येथील पेट्रोलपंपासमोर हा अपघात झाला. तानाजी बोबले व त्यांचा मुलगा अरविंद बोबले हे मोटारसायकलवरून जात असता त्यांना अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत होऊन तानाजी बोबले यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर टेम्पोचालकाने पलायन केले असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.