चिपळुणातील तरुणीचा पुण्यात निर्घृण खून

चिपळूण:- चिपळूणमधील तरुणीवर प्रेमप्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे येथे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. शुभदा शंकर कोदारे (28, मुळ चिपळूण, स्थायिक कराड, नोकरी निमित्त पुणे बालाजी नगर, कात्रज) असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28, रा. खैरैवाडी, शिवाजीनगर, मूळ उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटना अशी की, शुभदा मूळची चिपळूण येथील असून तिचे वडील व्यवसाय निमित्ताने कराड येथे स्थायिक आहेत. ती नोकरीमुळे पाच वर्षांपासून पुण्यात राहत होती. 2022 विमाननगर येथील डब्लूएनएस कंपनीत काम करत असताना, कृष्णा आणि शुभदा या दोघांची ओळख झाली. कृष्णा हा लिपिक पदावर तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पुढे दोघांचा चांगला परिचय झाला. त्यातून प्रेम संबंध जुळले. शुभदाने आपले वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या उपचारांसाठी कृष्णा याच्याकडून वेळोवेळी 4 लाख रुपये घेतले. तिच्या सतत पैसे मागण्यामुळे कृष्णाला संशय आला.

अडीच महिन्यांपूर्वी त्याने थेट कराड गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली खाल्ल्याचे समजले. शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले होते. त्या रागातूनच कृष्णाने शुभदाला जखमी करायचे होते. मंगळवारी येरवाडा येथील डब्ल्यू एन. एस. कंपनीच्या पार्किंगमध्ये सायंकाळी 6 वाजता कृष्णा याने तिच्यावर सपासप वार केले. मात्र, वाद वाढल्याने रागाच्या भरात कृष्णाने जोरात 4-5 वार तिच्या हातावर केले. हे वार इतके जोरात होते की, त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि कार्डियाक अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कृष्णा सत्यनारायण कनोजा याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.