चिंताजनक; अरबी समुद्रातील वादळे वाढणार 

किनारपट्टीवर दरवर्षी करावा लागणार वादळांचा सामना 

रत्नागिरी:- ‘‘समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले की कमी हवेचा दाब तयार होतो. ती परिस्थिती अरबी समुद्रात गेल्या दोन वर्षांत वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे वादळांना दरवर्षी तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम किनारपट्टीवरील जीवनमानावर होणार आहे,’’ अशी भीती हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्‍त केली. वादळाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

बंगालच्या उपसागरातील वादळे पूर्व किनाऱ्यासाठी धोकादायक ठरतात. आता पश्‍चिमेकडील वादळे पश्‍चिम किनारपट्टीला धोक्‍याची ठरली आहेत. ही परिस्थिती भविष्यात कायम राहणार असून अरबी समुद्रातील वादळांना दरवर्षी तोंड द्यावे लागणार आहे. कोकण किनारपट्टीतील वास्तव्य धोक्‍याच्या रेषेवर असल्याचे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘पाण्याचे तापमान वाढल्याने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. सध्या सर्वसाधारणपणे ९९२ हॅप्तापास्कल हवेचा दाब आहे. त्याच्याभोवती १ हजार, १००२ हॅप्तापास्कल दाब तयार होतो. कमी दाबाच्या पट्ट्याबरोबर गोल-गोल वारे तयार होतात. त्यालाच चक्रीवादळ (सायक्‍लॉन) म्हणतात. याच पद्धतीने अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होते. ही वादळे कमी दाबाच्या दिशेने पुढे सरकतात. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता क्‍यार, महा यांसह निसर्ग अशी चक्रीचादळे अरबी समुद्रात तयार होत आहेत. त्यातील निसर्ग वादळ तर भूपृष्ठावरून पुढे सरकत गेले.अनुकूल हवामान, समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान अरबी समुद्रात असल्याने वादळं तयार होतात. अशी चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात नेहमीच होतात; पण अरबी समुद्राचे गेल्या दोन वर्षातील रेकॉर्ड पाहता वादळाच्या घटना वारंवार घडत असल्याने हा हवामानातील बदल आहे. परिणामी चक्रीवादळ, गारपीट, दुष्काळ किंवा अतिवृष्टी होत आहे. ऑक्‍टोबर महिन्यात पाऊस पडल्यानंतर पुढे प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावली. मे महिन्यात उच्चांक गाठला.’’