चार लाखांची मासेमारी जाळी चोरल्या प्रकरणी गुन्हा 

रत्नागिरी:- समुद्रात मासेमारी करणार्‍यासाठी गेलेल्या नौकेवरील मिनी पर्सनेटची जाळी फाटल्याने समुद्रातून पुन्हा बंदरात आलेल्या नौकेवरील जाळी दुसर्‍या नौकेवर ठेवली असता ४ लाख रूपये किंमतीची ही जाळी चोरून नेल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर २०२० रोजी घडली. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत अली मुकादम (वय ६०, रा. मिरकरवाडा, पांजरी मोहल्ला) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. मुकादम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मिनी पर्सनेटची जाळी मासेमारी करताना फाटली म्हणून त्यांनी समुद्रातून परत येऊन जेटीवरील सलीम मुल्ला यांचे लॉंचवर फाटलेली जाळी ठेवली होती. ही जाळी आदील फणसोपकर व काल्या सिकंदर (पूर्ण नाव माहित नाही) यांनी चोरून नेल्याची तक्रार शौकत  मुकादम यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात भा.दं.वि.क. ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.